Skip to main content

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - १

ह्या वर्षी कश्मीर ला जायचं”, फेब्रुवारीतच ठरवलं होतं. सहसा कुठेही जायचं असेल तर मी खूप आधी प्लॅन, बुकींग वगैरे करतच नाही. फार तर फार महिना आधी मी बुकिंग्ज करतो. खरं तर ते नेहमीच महाग पडते, पण ऐन वेळी काहीतरी कारण निघून प्लॅन रद्द होण्यापेक्षा हे बरं असा काहीसा माझा विचार असतो. आणि ह्या वेळी माझा तोच विचार बरोबर आहे हेच सिद्ध झालं.

 

ज्या दिवशी कश्मीरला निघायचं, २८ मे ला, त्याच्या आदल्याच रात्री कोण्या अतिरेकी संघटनेच्या म्होरक्याला आर्मीने उडवला. सकाळचा पेपर तिथे उसळलेल्या दंगलींनी आणि अस्थिरतेच्या माहितीने भरून गेला होता. नेहमीप्रमाणे कर्फ्यु लागला होताच.


नेहमीच्या त्यानं-त्याच जागा बघण्यापेक्षा आपल्याला जे पटेल, आवडेल त्याप्रमाणे जाता ह्या हेतूने आम्ही टूर कोणत्या ऑपरेटर बरोबर जाता, आमची आम्हीच प्लॅन केली होती.  त्यामुळे लगेच जिथे राहणार होतो तेथे फोन केला.


कुछ नै साब, ये तो हमेशा का है आप बिनधास्त जाओ”, जेथे बुकिंग केले होते तिथल्या माणसाने full confidence दिला.


आपल्याच देशात फिरायला आपण का घाबरायचे?”,  ह्या हेतूने जे होईल ते बघू ह्या विचाराने आम्हीही निघालो.


साधारण १४ लोकं होतो, हातात वेळ होता आणि चिल्ले-पिल्ले रेल्वेने जाऊयात म्हणून मागे लागले होते,  म्हणून मग जातानाच जम्मू-तावीच आणि येताना विमानाचं तिकीट काढलं होतं. मला रेल्वेने प्रवास करून दहा-एक वर्ष तरी उलटून गेली होती. त्यामुळे ३६ तासाच्या प्रवासाबद्दल नाही म्हणलं तरी साशंकच होतोस्वच्छता असेल का? आजूबाजूची लोकं ठीक असतील का?  Toilets कशी असतील? खायचं कसं असेल? एक ना अनेक प्रश्न मनात ठेवून रेल्वे-स्टेशनवर धडकलो.


ठरल्यावेळी झेलम-एक्स्प्रेस धडधडत प्लॅटफॉर्म वर अवतरली. सगळं सामान घेऊन बोगीत बसलो आणि पहिला आश्चर्याचा धक्का बसला. बर्थ अगदी चका-चक्क होते. पडदे, अंथरूण-पांघरूण नव्यासारखी स्वच्छ धुतलेली, कडक्क होती, कुठेही कचरा नव्हतापहिली टेस्ट तर पास झाली होती, दुसरा टप्पा Toiletsचा.  हा धक्का जास्ती जोराचा होता. Toilets अगदीच स्वच्छ होती.  Indian आणि  Western दोन्ही पद्धतीची Toilets with Tissue role, Hand-wash पाहून विश्वासच बसेना.   काही मिनिटांतच ट्रेनने आपला वेग पकडला आणि थोडेफार फोटो उरकून मी आसनस्थ झालो. अर्थात सुखद धक्के संपायचे होते. काही वेळातच एक कर्मचारी रम-फ्रेशनर आणि मॉस्किटो-हिट फवारत गेला.  मी लगेच धपाधप हे सुखद धक्के व्हॉट्स-ऍप वर मित्रमंडळींना कळवले.



बराच वेळ रिकामे असलेली आजूबाजूची बर्थ नगर आणि दौडला सैनिक मंडळींनी व्यापून टाकली. उंचेपुरे, कमावलेली शरीर-यष्टी, रापलेला चेहरा.. काय पर्सनॅलिटी असते राव! चालण्यात, बोलण्यात एक वेगळाच डौल मन मोहून टाकतो.


आमची बाकीची गॅंग मध्यरात्री जळगांवला चढणार होती. फक्कड चहा मारला, बरोबर घेतलेले लाडू, चिवडा, शंकरपाळे हादडले आणि वरच्या बर्थवर निवांत आडवा झालो.


मधल्या वेळात, रेल्वेचा अजून एक कर्मचारी असाच एक धक्का देऊन गेला, फिनेल टाकून मधला भाग लख्ख पुसून काढला. हे प्रकार पुढे ठराविक वेळेने चालूच राहिले. कोल्ड्रिंक्स, अरबट-चरबट खाद्यपदार्थ येत जात होते.


साधारण -.३० च्या सुमारास माझे लक्ष वेधले गेले ते समोरच्या बर्थवर बसलेल्या एका सैनिकाच्या फोनवरील बोलण्याने.

हो अगं, जेवतोय नीट
“….. …”
दिवसभर खरंच जात नव्हते जेवणं, कदाचित संध्याकाळी जायचंय म्हणून असेल, पण आता लागलीय भूक, पोळ्या खाल्यात मी

मी हळूच वरून वाकून बघितले, तो खरंच सांगत होता

तू झोप आता, काळजी करू नको, रेंज असेल तसा फोन करत जाईन”, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला.


 

काय आयुष्य आहे ना? असं आपली प्रेमाची माणसं सोडून मृत्यूच्या जबड्यात जायचे. प्रत्येकवेळी निघतानापरत येऊ ना?” असा विचार येत असेल का त्यांच्या मनात? त्यांच्या नसेल तरी त्याच्या घरच्यांच्या मनात?


झोप येईना तसा बर्थ वरून खाली उतरलो, बॅगेतले एक सफरचंद कापले आणि त्याला दिले


सफरचंद? नको रे बाबा, गेली दोन वर्ष झाडाखाली बसून भरपूर सफरचंद खालली आहेत, कंटाळा आला आता त्याचा ..”, हसत तो म्हणाला
कुठे असते पोस्टींग सध्या?”
पठाणकोट”, तो उत्तरला


काही काळापूर्वीच बातम्यांमधून झळकलेले पठाणकोट आठवले. अतिरेक्यांनी केलेला तो भ्याड हल्ला आठवला.

कुठल्या गन्स असतात आता तुमच्याकडे, एके-४७ दिल्या कि नाही अजून?”
नाही, अजून तरी नाही”, तो कसनुसा हसत म्हणाला


पुढचा अर्धा-एक तास आर्मी, त्यांचे ट्रेनिंग, पोस्टिंग्स वगैरे गोष्टींवर गप्पा मारल्या. आजूबाजूचे मराठी भाषिक सैनिक सुद्धा गप्पांमध्ये सामील झाले.  थोड्यावेळाने,  आजूबाजूचे दिवे  हळू-हळू बंद होऊ लागले तसा मी सुद्धा आपल्या बर्थवर जाऊन ताणून दिलीसकाळी जाग आली ती गाडी कुठल्यातरी स्टेशनवर थांबली होती आणि फेरीवाले, विक्रेत्यांची लगबग चालू होती त्यांच्या आवाजाने. जळगांवची मंडळी OnBoard होती.


लगेच गप्पांचा फड जमला. पुढचा अख्खा दिवस खादाडी, ह्यास्यकल्लोळ, दुपारची वामकुक्षी ह्यातच वेळा. बघता बघता रेल्वेत बसल्यापासून २४ तास उलटूनही गेले होते.  गुगल-मॅप वर बदलणारे स्टेशन्स आणि राज्य बघून मज्जा वाटत होती. प्रत्येक स्टेशनवर तेथील स्पेशालिटी-आयटम्स विक्रीला येत होते. आग्रा-मथुराचा पेठा, दिल्लीचा सामोसा-चॅट, मथुरेला छोले पुरी भारीच होते.  रेल्वेत इकडे तिकडे फिरण्यात, एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जाण्यातही वेगळीच मज्जा आहे नै? नाहीतर ते विमानात सारखं आपलंअपनी कुर्सी कि पेटी बांधी राखिये


पंजाब राज्यातून जातानाच प्रवास खूपच छान होता. बाहेर भरपूर हिरवीगार शेती, उंचच-उंच झाडं, सधन भासतील असे शेतात काम करणारे शेतकरी, मुबलक पाण्याने भरून वाहणारे कालवे .. सर्वत्र निसर्ग-संपन्नता होती.




ह्या सगळ्या गडबडीत रेल्वेचे ते सुखद धक्के काही केल्या संपत नव्हते. जेवणासाठी एकदा बिर्याणी मागवली आणि थोड्याच वेळात रेल्वे-प्रशासनाचा माणूस समोर उभा ठाकला.


बिर्याणीचे किती पैसे घेतले?”
चव कशी आहे, योग्य गरम आहे ना?”
हायजेनिक आहे का?”
रेटिंग्स किती द्याल ?”

वगैरे प्रश्न ऐकून थक्कच व्हायचं बाकी होतो.


वेळ अगदी मस्तच चालला होता आणि अचानक एक बातमी येऊन धडकली. बायकोच्या भावाला, त्याच्या जम्मूतील ओळखीच्या एकाने सांगितले कि जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केलाय, श्रीनगर मध्ये कर्फ्यू लागू झालाय.


लगेच गुगलींग चालू केले, पण एक न्यूज-पेपर सोडला तर बाकी कुठेही काही बातमी नव्हती.


आजूबाजूच्या सैनिक-बांधवांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काही कल्पना नव्हती. शिवाय त्यांना हे नेहमीचेच असल्याने त्यांनीही निर्धास्त रहायला सांगितले.


पठाणकोटला आर्मी-बेस असल्याने बरीचशी ट्रेन रिकामी झाली होती. ठरल्या वेळेच्या एक तास उशिरा जम्मूला उतरलो.

बोगीतच एक आर्मी-ऑफिसर होता, उतरल्या उतरल्या तो आमच्यातील एकाला घेऊन स्टेशनवरील आर्मी-छावणीकडे अधिक माहिती मिळवण्यासाठी घेऊन गेला. तोवर फलाटावरील इतर लोकांकडे आम्ही आमचे चौकशी सत्र सुरु केले. एका बाकड्यावर एक पोलीस आणि एक आर्मी ऑफिशिअल बसले होते ट्रेन ची वाट बघत.


सब बंद है श्रीनगर, वापस लौट जाओ, हालत बत से बत्तर है. पथ्थर फेक रहें है वहा, हम लोग वहींसे आए है.”, तो पोलीस उत्तरला

आर्मी-छावणीतून आलेली माहितीही फार उत्साहवर्धक नव्हती

सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.


आम्ही सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडायला सुरुवात केली. वाटेत दिसेल त्याला श्रीनगरची चौकशी सुरूच ठेवली. बहुतेक आर्मीच्या लोकांनी तेथील परिस्थिती गंभीर असल्याचेच सांगितले, तर जम्मूचे पोलीस अगदी उलट होते.


श्रीनगर हायवे चालू है का क्या मतलब? वो बंद कब हुआ था?”
सब ठीक है, बिलकुल जाओ श्रीनगर

एका पोलिसांचे उत्तर तर अगदी गीतेचे सार होते, “मौत तो आनी हि है एक दिन. बस्स इतना देखना कि वो अच्छी आए

फार मिक्स उत्तर मिळत होती. काहीच सुचत नव्हते.

प्रत्येकाच्या मनात आणि चेहऱ्यावर एकच प्रश्न ….. “आता?”

 

[क्रमश:]


I'm the author and owner of the most popular Marathi Novels blog - डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा https://manaatale.wordpress.com Here i will be sharing my travel stories

Comments