मैक्लॉडगंज
रात्री, साधारपणे 11.30च्या सुमारास वेड्या-वाकड्या वळणाचा घाट पार करत आमची गाडी मैक्लॉडगंजच्या जवळ पोहोचली होती. आजूबाजूला किर्र काळोख होता. आर्मी-कोर्टर्सच्या बाहेर हातात बंदुका धरून उभे असलेले सैनिक सोडले तर पूर्ण रस्ता निर्मनुष्य होता.
मार्केटही पेंगुळलेलेच होते. नुकतीच जेवणं आटपून हातात-हात घालून फिरणारी नवपरिणीत जोडप्यांची संख्याही लक्षणीय होती. गावातले रस्ते प्रचंड लहान होते, त्यामुळे एकदा पुढे गेल्यावर परत गाडी वळवून मागे येऊन हॉटेल शोधणे एक दिव्य प्रकार ठरला. हॉटेलपाशी पोहोचतच होतो तर अचानक गाडी समोर गलका उडाला. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकाला काही लोकांनी मिळून गाडीवरून खाली खेचला होता आणि त्याची धुलाई चालू होती.
आयुष्यात पहिल्यांदाच असे झाले असेल कि आम्ही कुठल्या हॉटेलला चाललो आहोत, ते कसे असेल ह्याची तिळमात्र कल्पना नव्हती. सगळं बुकिंग अगदी काही मिनटांतच उरकले असल्याचा परिणाम होता. पण नशिबाने हॉटेल छान निघाले. सर्वत्र प्रचंडच थंडी होती. खोलीत वुडन-फ्लोरिंग असूनही पायाला थंडी वाजत होती. पुणेकर असल्याने लगेच कानटोपी, सॉक्स चढवले आणि थोडं फ्रेश होऊन खाली उतरलो.
खाण्यासाठी काही मंडळींनी पारंपरिक हॉटेलचाच मार्ग धरला, तर काही लोकांनी कबाब-मोमोजकडे धाव घेतली.
यथेच्छ पेट-पुजा झाल्यावर तुझी खोली बघू, माझी खोली बघु करून आम्ही सरळ बेडमध्ये घुसलो. दोन दिवसांनंतर मस्त गुबगुबीत बेड मिळाला होता. बेडच्या समोरच विशाल काच होती ज्यातून बाहेरचा नजारा, व्हॅली दिसत होती. काही मिनिट गेली आणि आकाशात एक वीज कडाडली, थोड्यावेळाने दुसरी आणि मग चमकणाऱ्या विजांचे सत्रच सुरु झाले.
“अरे देवा । पाऊस कि काय?” म्हणेस्तोवर बाहेर पावसाला सुरुवातही झाली होती. विजांचा कडकडाट चालूच होता. डोळे मिटले तरी त्या मोठ्या काचेमुळे चमकणाऱ्या विजा जाणवतच होत्या, पण थकवा असल्याने, त्यात ती प्रचंड थंडी आणि अंगावर गरम पांघरून, त्यामुळे लगेचच झोप लागली.
सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर फटफटायला लागले होते. घड्याळ बघितले तर कुठे ५-५.३०च वाजत होते, प्रकाश मात्र जणू ७ वाजून गेले असावेत. पुन्हा झोपायचा निरर्थक प्रयत्न करून शेवटी पांघरून झटकून बाल्कनीत आलो. दूरवर व्हैली मध्ये ढग खाली उतरले होते. फटाफट आंघोळी उरकल्या, ब्रेकफास्ट केला आणि फिरायला बाहेर पडलो.
मेक्लोडगंज चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेले होते. डोंगरांवरची हिमशिखरे सृष्टिसौंदर्याला अधिकच खुलवत होती. मध्येच ढगांनी डोंगर झाकला जायचा, तर ढग बाजूला झाल्यावर दिसणारी ती हिमशिखरे स्तिमित करायची.
सर्व बाजुंनी बर्फ असल्याने वाऱ्याची झुळूकही अंगावर काटा आणत होती. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोर्चा वळवला तो ‘भागसु धबधब्याकडे’ अर्थात त्याला फारसे पाणी नव्हते, परंतु तेथपर्यंत पोहोचण्याची वाट खूपच सुरेख होती. साधारण एक किलोमीटरचा तरी walk होता. तेथे पोहोचेपर्यंत पुरी दमछाक झाली. पण आवडती गोष्ट म्हणजे ढीगभर फोटो मिळाले, सेल्फी, गृफी, निसर्गचित्र, फुलं, गुबगुबीत मेंढ्या, रंगीत किडे आणि वगैरे वगैरे
लेज खाणाऱ्या लोकांच्या अंगावर इथल्या मेंढ्या धावून जात होत्या.. लेज खाण्यासाठी. नेहमी माकडं असले प्रकार करताना पहिले होते… काय नं? पहावं ते नवलच. चढाई करून त्या थंडीतही मस्त घाम फुटला. मग अमूलची कोल्ड-कॉफी पोटात ढकलली आणि दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळाकडे निघालो.
गावातील रस्ते लहान असल्याने आमचा गाडीवाला गाडी गावाबाहेरच बाहेर पार्क काढून झोपा काढत होता. आम्हाला चालण्याशिवाय पर्याय नव्हता.
संपूर्ण रस्ता स्वच्छ आणि देवनारच्या वृक्षांनी सजलेला होता. सूर्य एव्हाना पुन्हा ढगांआड गेला होता. रस्त्यावर एका ठिकाणी एक वृध्द तिबेटियन जोडपे सारंगी सारख्या वाड्यावर ‘परदेसी -परदेसी’ गाणं वाजवत होते. ते मधुर स्वर पूर्ण व्हैली मध्ये भरून गेले होते. फारच स्वर्गीय अनुभव होता तो. काही निवडक लोक ते संगीत आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत होती. माझ्या मते, मोबाईल ते दृश्य, ते स्वर, तो अनुभव सामावून घेण्याच्या पलीकडे होता. आम्ही चालत राहिलो, काही अंतर दूरपर्यंत ते संगीत ऐकू येतच होते.
मैक्लॉडगंज ट्रेकिंगसाठीही बरेच प्रसिद्ध असल्याचे लक्षात आले. ठिकठिकाणी ट्रेकिंगच्या जागांची माहिती देणारे, ट्रेकिंगचे साहित्य पुरवणारे किंवा ट्रेकिंग ऑर्गनाईझ करणारे माहितीपत्रक लावलेले होते.
एव्हाना दुपारची जेवणाची वेळ होत आली होती, पण नेहमीचंच जेवायचा कंटाळा आला होता. मग एका बेकारीतून १५-२० प्रकारच्या जम्बो पेस्ट्री, व्हेज/चिकन पॅटिस, पनीर सँडविचेस, व्हेज हॉट-डॉग सारखा चविष्ट माल भरून घेतला आणि ट्रॅव्हलर मध्ये बसून पुढील स्थळी निघालो. काही अंतरावरच पुढे गोथिक शैलीचे छोटेसे सेंट जॉर्ज चर्च होते. १८५२ साली बांधलेले हे चर्च सर्व बाजूनी घनदाट देवदार वृक्षांनी वेढलेले आहे.
येताना वाटेत काही टी-इस्टेट होत्या तेथेही थांबून डझनभर फोटो काढले. मग मेक्लोडगंज गावातून एक फेरफटका मारला. खूपच शांत आणि सुंदर शहर भासले. कुठे गर्दी नाही, गोंगाट नाही, ट्रॅफिक जॅम नाही, सर्वत्र हिरवीगार झाडी आणि आजूबाजूला बर्फाचे डोंगर. वाटलं, आपण इथेच का नाही जन्मलो? इथेच का नाही लहानाचे मोठे झालो? कदाचित आज असेच एखादे स्वेटर-कान टोप्यांचे, तिबेटियन वस्तूंचे किंवा टूर ऑर्गनाईझ करणाऱ्या एखाद्या टूर ऑपरेटरचे दुकान टाकून बसलेले असतो.
हॉटेलमध्ये परतेस्तोवर पायाचे तुकडे पडले होते, पण तरीही शॉपिंगसाठी पुन्हा जवळच्या मार्केटमध्ये शिरलो. वाटेत नेहमीच्याच मोमोजबरोबरो फ्राईड मोमोजही दिसले. नकळत पावलं तिकडं वळली आणि मग त्या जबरदस्त थंडीत गरमागरम मोमोजवर हल्ला चढवला.
शॉपिंगसाठी आवर्जून घ्यावे असे विशेष काही नव्हते त्यामुळे किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.
रात्रीच जेवायला मुद्दाम मोकळ्या जागेतच बसलो. पुणे-जळगावचा उन्हाळा सोडून इथल्या थंडीत आलो होतो, मग ती थंडी अनुभवायला नको?
ऑल-इन-ऑल पहिला दिवस तर फारच मस्त गेला होता. अर्थात काश्मीरची सर हिमाचल-प्रदेशला येणं शक्यच नाही, पण why to compare?
[क्रमश:]
Comments
Post a Comment