Skip to main content

Brugge, Belgium

काही वेळातच बस पॅरिसच्या बाहेर पडली आणि भला मोठ्ठा हायवे सुरु झाला. सगळ्या गाड्या आपल्या आपल्या लेन्स व्यवस्थित पाळत होत्या. पुढची गाडी स्लो झाली तर मागचीही स्लोच होणार, पण लेन कट करुन, ओव्हरटेक करुन जाणं नाही म्हणजे नाही. काही वेळातच टोल नाका आला. ५-६ नाही तर तब्बल १५ लेन्स होत्या. एकाही ठिकाणी पैसे गोळा करायला माणूस नाही. गाडी जवळ आली कि तेथे लावलेल्या कॅमेरातून गाडीचा नंबर टिपला जायचा, तिथल्या एका मशीन मध्ये क्रेडिट-कार्ड सरकवले कि झाले काम. पुढचा बॅरिकेड आपोआप उचलला जायचा. टोटल टाइम टेकन फॉर टोल इज १० सेकंड्स. त्यापूढीलही कुठल्याही टोलवर गर्दी लागली नाही. एका वेळी पुढे २ गाड्या होत्या हीच काय गर्दी. इथे म्हणे बहुतेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरला दर दोन तासांनंतर २० मिनिटांचा ब्रेक घेणं कंपलसरी आहे. नियम मोडलेला आढळल्यास त्या वाहनाचे, ड्रॉयव्हरचे किंवा त्या प्रवासी कंपनीचेही लायसन्स जप्त होऊ शकते. एका छोट्या मॉटेलवर, एक छोटा ब्रेक घेऊन ४ तासांतच आम्ही बेल्जीयमला पोहोचलो. गंमत म्हणजे एका देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात कधी प्रवेश केला ते कळलेही नाही. कुठेही नावालासुद्धा बॉर्डर नव्हती, पोलीस किंवा चेकिंग लांबची गोष्ट. साधं ‘वेलकम टू बेल्जीयम’ वगैरे पण नाही म्हणजे कमालच होती. टूर गाईडने पुन्हा एकदा मॅप मध्ये कुठे फिरायचे, काय बघायचे दाखवले आणि परत ह्याच ठिकाणाहून इतक्या इतक्या वाजता बस निघेल सांगून निरोप घेतला. 

 बस मधून बाहेर आलो तेंव्हा सकाळचा गारठा नावालाही नव्हता, ऊन जाणवत नसले तरी उकाडा जाणवत होता. आम्ही ब्रुज मध्ये प्रवेश केला आणि पॅरिस आणि ब्रुज इतक्या जवळ जवळ असूनही दोन्हींमध्ये असलेला कल्चरल विरोधाभास लगेच जाणवला. आतापर्यंत बघितलेल्या पॅरिसमधल्या बहुतेक इमारती ह्या साधारण एकाच रंगातल्या होत्या, पिवळसर छटा असलेल्या, बाकीचे रंग अगदी नावापुरते असत. जी गोष्ट इमारतींच्या रंगाची तीच तऱ्हा लोकांच्या कपड्याच्या रंगाचीही. बहुतेक लोकांचे कपडे हि जास्ती करून पांढरे, क्रीम रंगाचे किंवा राखाडी रंगाचे.. फॅशन प्रत्येकाची वेगळी, पण रंग तेच. ह्या उलट बेल्जीयम विविध रंगात न्हाऊन निघाले होते, रंगीत इमारती, रंगीत कपडे घातलेली लोकं.. सगळंच रंगेबिरंगी.





आधी म्हणालो तसं इथे उन्हाळा नक्कीच जाणवत होता. बहुतेक लोक अतिशय कमी कपड्यातच फिरत होती. हिरवळीवर अनेक नयनरम्य दृश्य सन बाथ घेत, पुस्तक वाचत पहुडलेली दिसत होती. इथल्या रस्त्यांना रस्ते का म्हणावेत असाच मला काहीसा प्रश्न पडला होता. छोट्या छोट्या लेन्सचं जाळंच सगळीकडे पसरलेले होते. ९०% लोकं ही एकतर चालत किंवा सायकलींवर होते.


















   ब्रुजचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथल्या कॅनल्समधुन केलेली बोटीची सैर. आम्ही लगेच तिकीट काढली आणि रांगेत थांबलो. थोड्याच वेळात आमचा नंबर लागला. ह्या कॅनल्स मधून बहुतेक ब्रुजचे दर्शन घडते. आमच्या बोटीचा ड्रॉयव्हर थोडा वयस्कर पण प्रचंड रंगेल, उत्साही आणि फनी होता. असे असे ‘वन लायनर्स’ टाकायचा कि हसून हसून वाट लागायची.

ह्या सुंदर कॅनल्स मुळेच बहुदा ब्रुजला ‘व्हेनिस ऑफ द नॉर्थ’ म्हणत असावेत.














  तास-दीड तास फेरफटका मारुन मग एका बागेत आम्ही थोडा वेळ विसावलो. भूक लागली होती. आजूबाजूला खाद्यपदार्थांची रेलचेलही होती, पण आम्हाला खुणावत होते ते सोबत आणलेले ‘कल्याण-भेळ’चे रेडी-टू-मेक पाकीट. मग मस्त चुरमुरे, फरसाण, चिंचेचे आंबट गोड, आणि तिखट पाणी आणि मग त्या हिरवळीवर बसून मस्त ती भेळ हाणली.

खाण्याचा कार्यक्रम उरकल्यावर बाजारात फेरफटका आणि शॉपिंग मस्ट होते. दुकानं तर बेल्जीयम चॉकलेट्सनी खचाखच भरली होती. शेवटी एका दुकानात शिरलो आणि अधाश्यासारखी चॉकलेट्स खरेदी केली. डार्क चॉकलेट्स, व्हाईट चॉकलेट्स, जम्बो, कँडी, मिक्स-नट चॉकलेट्स.. कित्ती व्हरायटी होती. दुकानात शिरायच्या आधीच स्वाती-ताईने सांगितले होते, किंमती बघून गुणिले ८१ वगैरे
करून कन्व्हर्जन करायचे नाही.. नाहीतरी सगळंच महाग वाटेल. आपण तरी कुठे पुन्हा पुन्हा बेल्जीयम ला येणारे म्हणून दिल खोल के खरेदी केली. काही दुकानांमध्ये फ्रिज ला लावायचे बेल्जीयम मोमेंटोज वाले मॅग्नेटस होते ते घेतले. बिलाचा आकडा जास्तीच फुगायला लागला तास काढता पाय घेतला.





















   बरोबर दिलेला मॅप आणि रस्त्यावरील पाट्यांची जुळवाजुळव करत बाकीची ठिकाणं पण फिरलो. कित्तेक दिवसांनी खरं तर इतकं चाललो होतो. पण हवा चांगली असल्याने दमायला असं कधी झालं नाही, हां पण पायाचे मात्र तुकडे पडायचेच बाकी होते. रस्त्याने येणाजाणारा जो तो एक तर आईस्क्रीम नाहीतर बिअर घेऊनच फिरत होता. शेवटी मग एका आईस्क्रीम पार्लर कडे मोर्चा वळवला.



City Hall

समोरच मोठ्ठा सिटी-हॉल उभा होता. १४२१ साली बांधलेली ही इमारत अजूनही इतक्या सुस्थितीत उभी आहे हे बघून पुन्हा एकदा आश्चर्य वाटून गेले. साहजिकच पुण्याचा रहिवासी असल्याने पहिल्यांदा आठवला तो शनिवारवाडा. १७३२, म्हणजे तब्बल तीन शतकं नंतर बांधलेला शनिवारवाडा आज कुठल्या स्तिथीत आहे. बाहेरुन तरी परिस्थती ठीक म्हणायची, पण आतून? काय राहिलंय त्याच बघायला? परदेशी पाहुण्यांकडून आपण ५००रु. तिकिटं घेतो आणि आत गेल्यानंतर काय दाखवतो आपणं त्यांना?

का आपली मानसिकता अशी आहे? आपल्याच वास्तूचं जतन आपण का नाही करू शकत? अजून किती दिवस आपण भ्रष्ट राजकारण, पैसे खाऊ वृत्ती, जात-भेद, हिंसा, आसुया, द्वेष आपल्यात जिवंत ठेवणार आहोत? पॅरिसमध्ये सुद्धा इतक्या जुन्या जुन्या इमारतींच संवर्धन इतक्या सुंदर पद्धतीने केलेले दिसते. चौदाव्या, पंधराव्या शतकात कधी काळी बांधलेले प्रीझन्स आज हॉस्पिटल्स होते, वर्ल्ड-वॉर च्या काळात बांधलेल्या सैनिक छावण्या आज शाळा, कॉन्सिल हॉल्स किंवा लायब्ररी होते. आपल्याकडेही काही अंशी जतन होते, नाही असे नाही, पण त्याच प्रमाण हातावर मोजता येतील इतकंच कदाचित असावं.



   रस्त्याने चालताना आजूबाजूच्या मोहक घरांचा आणि त्या अनुषंगाने त्यात घरात राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटून गेलाच. मागच्या जन्मी ह्यांनी असं काय पुण्य केलं असावं कि ह्या जन्मी त्यांना इथे राहायला मिळाले असावे असेच वाटत होते.

Basilica of the Holy Blood, Old St. John’s Hospital, Saint Salvator’s Cathedral, Provincial Court च्या इमारती सुंदर होत्याच पण विशेष उल्लेख करावा लागेल तो १३व्या शतकातले The Church of Our Ladyचे. ही इमारत खरोखरच सुंदर होती, ब्रुज मधली सगळ्यात उंच इमारत असल्याने, बहुतेक सर्व ठिकांणांवरुन दिसायची, पण नुसती ब्रुजमधली उंच एवढेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर ती जगातली दोन नंबरची विटांपासून बनवलेली उंच वास्तु आहे. परतायची वेळ झाली तसं आम्ही बस स्टॉपला येऊन थांबलो.



 बेल्जीयम वरून पॅरिसला परत येताना, सकाळपेक्षा हायवे-वर वाहतूक अंमळ जास्त होती, पण अर्थातच कुठेही घाईगडबड नाहीच. ओव्हरटेकिंग नाही की होंकिंग नाही. शेजारी पसरलेल्या विस्तीर्ण शेतांमध्ये सधन शेतकरी आपली अवजड वाहन चालवत शेतातली कामं करत होती.  सूर्याची तिरपी, कोमल किरणं मस्त गोल्डन लाईट पसरवत होती.  बसमध्ये खायला परवानगी नव्हती, पण ऐकू तर आपण भारतीय कुठले. एकेठिकाणी थांबलेल्या मॉल वर काही वेगळ्याच चवीचे चिप्स आणि कुकीज खरेदी केल्या होत्या त्या खुणावत होत्या. आजूबाजूची जनता घोर झोपेत मग्न होती. मग हळूच पिशवीत हात घालून एक एक गोष्टी काढून, आवाज न होऊ देता चर्वण चालू केले. 

पॅरिसला पोहोचेपर्यंत ८.३० वाजून गेले होते. पण मस्तपैकी ऊन असल्याने आजूबाजूचा परीसरही फिरुन घेतला. Arc the triomphe, Place de la Concorde square बघितला. पॅरिस मध्ये Eiffel tower नंतर Arc the triomphe आणि त्यासमोरचा हा रस्ता सर्वात जास्ती फोटो काढण्यात येत. असलेला परिसर आहे.

 पॅरिसमध्ये शिरुन अर्धा-पाऊण तास होऊन गेला आणि अचानक समोर दिसला तो लांबलचक पसरलेला चॅम्प्स एलिसिस (Champs-Élysées) मार्ग...
  
 जे लोक सायकलींग स्पोर्ट्स चे किंवा सायकलींची जगप्रसिद्ध रेस 'टूर-दी-फ्रांस' चे चाहते आहेत, त्यांना 'चॅम्प्स एलिसिस' काही नवीन नाही. 'टूर-दी-फ्रांस' रेसची पॅरिसमधील ज्या ठिकाणी सांगता होते, जेथे बक्षीस समारंभ होतो, हाच तो रस्ता.

ह्या रस्त्यावर काय नाही?

    साधारण २ किलोमीटरचा हा रस्ता फिरण्यासाठी तर खूपच छान आहे. आजूबाजूला अनेक ब्रँडेड कंपन्यांची दुकानं आहेत. खरेदीची आवड असेल आणि खिश्यात बक्कळ पैसा असेल तर इथे शॉपिंगसाठी भरपूर वाव आहे.
  H&M, Louis Pion, Gap, ZARA,Tiffany & Co.,BOSS,Tissot, Victoria Secret अश्या अनेक नावाजलेल्या ब्रॅंड्सची दुकान तर आहेतच, शिवाय लंडन आय सारखं मोठ्ठ 'Big Wheel' आहे, लिडो कॅब्रे आहे (त्याबद्दलही, पुढच्या एखाद्या भागात सविस्तर लिहिणार आहेच), पॅरिसीयन टच असलेल्या खास खाद्य-पदार्थांची रेलचेल आहे, तरुणाईने अखंड खळाळून वाहणारा उत्साह आहे, दुसऱ्या टोकाला 'आर्क-द-ट्रिओम्फ'(Arc De Triomphe) आहे.  


Arc De Triomphe

     वर म्हणल्याप्रमाणे, कितीही छोटी ट्रिप असली तरी आयफेल-टॉवर पाठोपाठ आर्क-द-ट्रायोम्फला. प्रवासी भेट देतातच. French Revolutiona आणि Napoleonic Wars च्या काळात फ्रांस चे जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ सन १८०६-१८३६ मध्ये, नेपोलियनच्या. पुढाकाराने आर्क-द-ट्रायोम्फची उभारणी करण्यात आली. त्याकाळी फ्रेंच सैन्याला 'Grande Armee' म्हणून संबोधत असत. १८०५ मध्ये जेंव्हा 'Grande Armee'ने युरोपचा बहुतांश भाग जिंकून घेतला होता आणि जेंव्हा फ्रेंच आर्मी जवळ जवळ अपराजित म्हणूनच गणली जात होती तेंव्हा, Austerlitz वरील विजयानंतर नेपोलियन त्याच्या सैन्याला म्हणाला होता -

“You will return home through archs of triumph”

आर्क-द-ट्रायोम्फला आतल्याबाजूने साधारण २५० पायऱ्या आहेत, त्या चढून वरती जाता येते












Louvre museum
पूर्वीच्या कुठल्याश्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेकांनी लूव्हरे-म्युझियमचा असा फोटो बघितला असेलच.







  जगप्रसिद्ध मोनालिसाचे लिओनार्डो डाव्हिंसी ने चितारलेले पेंटिंग ह्याच म्युझियममध्ये पहावयास मिळते.
 
  एकेकाळी राजवाडा असलेली ही भव्य वास्तू आज लूव्ह म्युझियम आहे. आतमध्ये प्रचंड गर्दी होती, एक तासाभराची तरी रांग नक्कीच होती. अर्थात मला म्युझियममध्ये फारसा उत्साह नसल्याने आम्ही आतमध्ये गेलो नाही .. मोनालिसाची भेट परत कधी तरी ..
 
  लूव्ह म्युझियम ने जगभरातील कलाप्रेमींना भुरळ घातलेली आहे. जर्मनीचा हिटलरही त्याला अपवाद नव्हता. जर्मनीने जेंव्हा फ्रांस वर आक्रमण केले तेंव्हा हिटलरने लूव्ह म्युझियम ला भेट दिली होती. असं म्हणतात, जगविख्यात मोनालिसाच्या चित्रासमोर तो अर्धा तास खिळून उभा होता.

















   आपलं चित्र 'लूव्ह म्युझियम' मध्ये लावलं जावं अशी प्रत्येक कलाकाराची एक सुप्त इच्छा असते. क्रिकेट प्रेमींसाठी जसे 'लॉर्डस', तसे कलाप्रेमींसाठी लूव्ह म्युझियम म्हणायला हरकत नाही. लाटूर, लिओनार्डो डाव्हिंसी, ले व्रुन, क्लोद, डेव्हिड, गेरिको, राफेल, वेरॉनिज, रुबेला अश्या अनेक whose-who कलाकारांच्या कलाकृती इथे पहायला मिळतात. इथे पेंटीग्स बरोबर अनेक आखीव-रेखीव शिल्प हि आहेत, त्यातील बहुसंख्य शिल्प रोमन साम्राज्यात आढळतात त्यासारखी- नग्न रूपातील पुरुष आणि बायकांची. 

   अर्थात मला मात्र भुरळ पडली होती ती ह्या काचेच्या मोठ्या पिरॅमिडची. काय विशेष होते त्या पिरॅमिड मध्ये? तसं म्हणलं तर काहीच नाही आणि तसं म्हणलं तर खूप काही.. कदाचित शब्दात नाही सांगता येणार. क्लोज शॉट्स, वाईड अँगल, उभे, आडवे सर्व तऱ्हेने ह्या पिरॅमिडचे फोटो मी कॅमेराने टिपून घेतले. खरं तर अधिक वेळ थांबून, अंधार पडल्यावर, आकाशात निळाई पसरलेली असताना आणि हा काचेचा पिरॅमिड दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला असताना त्याच रुप डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घ्यायला मला आवडलं असतं, पण दिवसभराच्या प्रवासाने आणि पायपिटीने सगळेच दमले होते, शिवाय, इथे उन्हाळा चालू असल्याने किमान १०.३० वाजेपर्यंत तरी सूर्यास्त व्हायची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे नाईलाजाने का होईना, तेथून बाहेर पडलो.

काही अंतरावरच बस-स्टॉप होता, आम्हाला हवी असलेली बस १.३० मिनिटात येईल असा तिथला साईन-बोर्ड सुचवत होता. पण माझं लक्ष वेधलं गेलं ते रस्त्याच्या शेवटी उभ्या असलेल्या भव्य 'ऑपेरा- हाऊस'. फारच सुंदर वास्तू होती ती. लगेच कॅमेरा काढला आणि क्लिक-क्लीकाट चालू केला.



   परफेक्ट अँगल मिळवण्याच्या नादात फुटपाथ सोडून किंचित रस्त्यावर उभं राहिलो होतो.
आपली 'सब चलता' है वाली Indian मेन्टॅलिटी, दुसरं काय? आधी म्हणल्याप्रमाणे, इथल्या बसेस हायब्रीड होत्या, त्यामुळे बसच्या इंजिनाचा आवाजच नसतो, त्यामुळे मागून आलेली बस मला कळलीच नाही. अगदीच नाईलाज झाला असावा म्हणून ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि मी दचकून बाजूला झालो.

    हॉर्नच्या आवाजाने अर्थातच अनेक लोकांचे माझ्याकडे लक्ष वेधले गेले होते हे सांगायला नकोच. ड्रायव्हरने दोनचार शिव्या हासडतच बसचे दार उघडले. गृहपाठ विसरुन वर्गात शिरलेल्या पोरासारखा गपगुमान आतमध्ये शिरलो आणि एकदम मागच्या सीटवर जाऊन बसलो.  एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते.

    पॅरिसला जातो आहेस .. तर क्रेप्स नक्की खा असे काही लोकांनी आवर्जून सांगितले होते. साधारण आपल्याकडच्या डोश्यासारखा दिसणारा हा पदार्थ, बटाटा भाजी ऐवजी चिकन, मटणच्या बरोबरीने अनेक स्वादिष्ट गोड पदार्थ जसे न्यूटेला-बनाना, चॉकलेट्सचे विविध सिरप्स, जेम्सच्या गोळ्या वगैरेंचा फिलिंग भरून मिळतो. अर्थात गल्लो-गल्ली क्रेप्स मिळत असले तरी, आम्ही जिथे राहत होतो तेथे एक चांगले क्रेप्सचं दुकान आहे असं स्वाती-ताईने सांगितले. मेट्रोने एक स्टेशन अलीकडे उतरुन थोडं चालावं लागेल इतकंच.

    शेवटी हो-नै करता करता तयार झालो. मग पुन्हा बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरून मेट्रोचा मार्ग धरला. पॅरिसची बहुतांश मेट्रो भूमिगत आहेत, किमान ७-८ जिने उतरुन खाली जावे लागते. पुन्हा पायपीट करत एकदाचे मेट्रो-स्टेशनला पोहोचलो. अर्थात इथे मेट्रोसाठी फारशी वाट पाहावी लागत नाही. मग एक स्टेशन अलीकडे उतरून, पुन्हा ७-८ जिने चढून वर आलो आणि काही १-२ पूल ओलांडून एकदाचे त्या दुकानापाशी पोहोचलो खरं, पण हाय रे दुर्दैव !, नेमकं ते दुकान बंद होते. त्या दिवशी सोमवारही नव्हता, आणि दुपारचे १-४ हि वाजले नव्हते .. तरी दुकान बंद म्हणजे काय?

चिडचिड झाली, पण पर्याय नव्हता. पाय ओढत ओढत पुढचे २ कि.मी. चालून एकदाचे घरी पोहोचलो.

   उद्याचा दिवस आम्ही प्लॅन केला होता सायकलिंग साठी, पण सद्य परिस्थिती बघता, एकूणच 'मैदान पर काले बादल छाये हुए है, बुंदाबांदी कि आशंका जताई जा रही है' चीच परिस्थिती होती.

   आधीच पायाचे तुकडे पडले होते, त्यात परत सायकलींग जरा अवघडच वाटत होते.  हवेत गारवा प्रचंड वाढला होता. पाय पण ठणकायला लागले होते. बरोबर काही रेडी-टू-कुक पंजाबी-कोल्हापुरी भाज्या न्हेल्या होत्या त्याच बनवल्या, फोटोंचा बॅकअप घेतला आणि मस्त जाड- दुलईमध्ये शिरलो...
I'm the author and owner of the most popular Marathi Novels blog - डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा https://manaatale.wordpress.com Here i will be sharing my travel stories

Comments