Skip to main content

काश्मीर ऐवजी पोहोचलो हिमाचल प्रदेशला - ४

 वाघा बॉर्डर

वाघा, अमृतसर पासून साधारण ४०कि.मी. अंतरावर, भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डर वर वसलेले गाव. इथली बॉर्डर, तेथे संध्याकाळी होणारी परेड फार प्रसिद्ध आहे वगैरे ऐकून होतो. पण कधी ह्या भागात येण्याचा योग आला नव्हता. आमचे काश्मीर दर्शन हुकले आणि योगायोगाने हि संधी चालून आली. अर्थात खरं सांगायचं तर मला फारशी उत्सुकता नव्हती, आता आलोच आहोत तर बघू असाच काहीसा विचार डोक्यात होता.

सकाळी हॉटेल मधून चेक-आउट करून सुवर्ण मंदिराला भेट दिली.  तेथून अगदी जवळच असलेली ‘जालियानवाला बाग’ सुद्धा पाहिली. अर्थात ह्या दोन्ही बद्दल नंतर कधीतरी सावकाशित लिहीन.


ऊन प्रचंडच तापले होते. हिमाचल प्रदेशच्या थंडीतून इथे आल्यानंतर हे ऊन अधिकच भाजून काढत होते. सुवर्ण मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी मिळणाऱ्या थंडगार लस्सीचे २-३ ग्लास पोटात ढकलले आणि वाघा बॉर्डरकडे प्रयाण केले.

संध्याकाळची ती परेड साधारणपणे ५ वाजता सुरु होते, पण पुढे जागा मिळवायची असेल तर लवकर जाणे मस्ट, त्यामुळे १ वाजताच निघालो. पोहोचेस्तोवर २ वाजलेच. पोहोचलो तेंव्हा आधीच गर्दी उसळली होती. पटापटा रांगेत लागलो. सेक्युरीटी चेक्स वगैरे पार करून मुख्य स्टेडीयमपाशी पोहोचलो. नशिबाने पुढची जागा शिल्लक होती, पण त्याला कारणही तसेच होते. पुढचा सर्व भाग कडक उन्हामध्ये होता. जून महिन्यातले, अमृतसरचे, ३ वाजताचे ऊन ज्याने अनुभवलंय तोच जाणे. बसायच्या पायऱ्याही भयंकर तापल्या होत्या, बसणं अशक्यच होतं. कडक्क ऊन अगदीच डोक्यावर होतं. सॉल्लिड म्हणजे सॉल्लीडच गरम होत होते. काही वेळ कसाबसा काढला खरा पण बरोबरची पोरं कुरकुर करायला लागली. अश्यातच समोरच्या स्टेडीयम मधील एक मुलगी उन्हामुळे चक्कर येऊन पडली. तिचे बाबा तिला घेऊन धावत धावतच बाहेर पळाले. अधिक धोका पत्करणे मूर्खपणाचे होते. मलापण ते ऊन सहनच होत नव्हते. मी मुलांना घेऊन बाहेर जातो, तुम्ही ती परेड बघून बाहेर या असं सुचवले देखील. पण आता आलाच आहेस इथपर्यंत तर हे चुकवू नको असे बरोबरच्यानी सुचवले. शेवटी काही महिला मंडळी मुलांना घेऊन थोड्या सावलीच्या ठिकाणी जाऊन बसल्या. एव्हाना मी एक टोपी आणि छत्री मिळवली होती. बरोबरच रुमाल बिसलेरी पाण्याने ओला करून डोक्यावर टाकला, पण उन्हाची काहिली काही केल्या कमी होतंच नव्हती. वाटत होतं, सगळं सोडून जावं निघून इथून.

घड्याळाचा काटा अत्यंत संथ वेगाने पुढे सरकत होता. बघता बघता सर्व स्टेडियम पूर्ण भरून गेलं. हाकेच्या अंतरावर भारताचे गेट होते आणि पलीकडे पाकिस्तान.

अक्षरशः क्षण आणि क्षण मोजून काढत होतो. आपल्या बाजूला हजाराच्या वरती लोक जमली होती. काही व्ही.आय.पी. मंडळी अगदी गेटच्या जवळ उभं राहून तेथील सैनिकांकरवी आपले ग्रुप फोटो काढून घेत होते. इतका राग आला होता त्यांचा… असो.

पाकिस्तानच्या बाजूला फार-तर-फार २०-३० लोक जमली होती. उगाचंच मोबाईलचा टॉर्च चालू करून तिकडून सगळ्यांना हात करत बसले होते येडे.

ते दोन भयंकर तास शेवटी कसे बसे सरले. रस्त्यावरची गर्दी एव्हाना पांगली होती, सर्वजण आपल्या जागेवर बसले होते. लोकांना माईक वरून सूचना दिल्या जात होत्या.

थोड्याच वेळात स्पीकर वर देशभक्तीपर गीतं लागली आणि अंगात जणू स्फुरण चढले.

“रंग दे बसंती चोला” गाणं सुरु झालं आणि पब्लिकने एकच आवाज केला, प्रचंड जल्लोष, इतका कि पाकिस्तानच्या बाजूचे लोक सुद्धा बहिरे झाले असतील.
“सुनो गौर से दुनियावलो, सबसे आज होंगे हिंदोस्तानी” गाण्याने अंगावर शहारे आणले.

प्रेक्षांतील महिलांना रस्त्यावर येऊन नृत्य करण्याची मुभा देण्यात आली आणि एक एक करत बरीच गर्दी जमा झाली. त्या नृत्यामध्ये जोश होता, उल्हास होता, अभिमान होता, स्वातंत्र्य होते.

पाकिस्तानच्या बाजूला अजूनही रस्त्यावर शुकशुकाटच होता. त्या बाजूलाही काही गाणी सुरु होती इतकंच.

आपल्या बाजूचे नृत्य जणू एका लग्नाला आलेल्या वरातीसारखं वाटतं होते. कोण कुठल्या गावचे, कुठल्या प्रांताचे, पण सर्व एकरूप होऊन नाचत होते.

सैनिकांनी मग त्यांना भारतीय ध्वज दिला आणि तो ध्वज घेऊन साधारण त्या गेट पर्यंत धावत जाऊन यायची मुभा दिली.

“आईशप्पथ काय नशीब आहे राव…” नकळत डोक्यात विचार येऊन गेला

एक मारवाडी आज्जी, डोक्यावरून घुंगट घेऊन हातात भारताचा ध्वज घेऊन धावत गेल्या तेंव्हा अख्ख स्टेडियम किंचाळत होतं.

वाटलं किती स्वातंत्र्य आहे आपल्याला. कुणाला बंधन नाही कशाचं. हेवा वाटावा असा आपला देश, आपली संस्कृती आहे. हळूहळू महिलांबरोबर छोट्या मुलांनासुद्धा त्यात सामील केले गेले. मी पण माझ्या मुलाला पाठवून दिले.  Moment of a lifetime it was.


थोड्यावेळाने सैनिकांनी पुन्हा रस्ता मोकळा केला. आता मुख्य परेडची वेळ झाली होती. उपकार करण्याइतपत सूर्याची दाहकता थोडी कमी झाली होती, जोडीला थोडे वारे सुटल्याने बरंच बरं वाटत होते.

काही वेळातच परेड सुरु झाली. डोक्याला काळं फडकं बांधलेले दोन तरणेबांड जवान ताड-ताड पावलं टाकत अगदी त्या गेटच्या जवळ गेले.

साला, काय ऍटिट्यूड होता त्यांचा, काय माज होता, त्यांच्या चालण्यात. जणू परवानगी दिली तर आत्ता गेट ओलांडून पाकिस्तान मध्ये घुसतील आणि एकेकाचा खात्मा करतील.

मागोमाग, बी.एस.फ.च्या दोन महिला सैनिक संचालन करत गेट पर्यंत गेल्या. काय वय असेल त्यांचं? २२? २५? पण काय तडफ होती त्याच्या देहबोलीत, काय आत्मविश्वास होता त्यांच्या चेहऱ्यावर. आणि आपण? आपण काय होतो? काय करत होतो २२-२५चे असताना?

पाठोपाठ बी.एस.फ.च्या सैनिकांची एक तुकडी संचालन करत गेली आणि ‘भारत माता कि जय’, ‘वंदे मातरम’ ने स्टेडियम निनादून गेले. त्याबाजूला सुद्धा एव्हाना काही कार्यक्रम सुरु होते, पण मला खात्री आहे, भारतीयांच्या ह्या आवाजात, त्यांचे बोलणे सुद्धा त्यांना ऐकू गेलं नसेल.

ह्या सगळी परेडचे सूत्र संचालन करणारा सफेद ती-शर्ट-पॅन्ट वेशातील सैनिक लोकांना माईक वरून उचकवत होता. आणि त्याबरोबर जल्लोष क्षणा-क्षणाला वाढतच होता.


ओरडून ओरडून घसा कोरडा पडला होता. भावनांचे इतके विचित्र मिश्रण मनामध्ये झाले होते, देशाबद्दल इतकी अभिमानाची भावना मनामध्ये निर्माण झाली होती कि त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच. नकळत डोळ्यात अश्रू जमा झाले होते, खूप जोरात ओरडायची इच्छा होती, पण शब्दच फुटत नव्हते, जणू कंठ दाटून आला होता.

फोटो अनेक काढले, पण तेथील अनुभव कुठल्याही फोटोला १% पण न्याय देऊ शकत नाहीए हे खरं.

गेट उघडले गेले आणि दोन्ही बाजूचे सैनिक ताड-ताड पावलं टाकत एकमेकांना सामोरे गेले. जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. त्याबाजूचे सैनिक ढोल-बिल घेऊन आले होते वाजवायला, आपल्या बाजूला हजारो लोक असताना त्याची गरजच नव्हती. साउंड-लेव्हल ची मर्यादा कित्तेक पटीने ओलांडली गेली होती. सर्वांच्या अंगात जणू एक अदृश्य शक्ती संचारली होती. अंगावर क्षणा-क्षणाला रोमांच फुलत होते.

तासाभराचा तो कार्यक्रम केवळ अवर्णनीय होता. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच… बघायलाच पाहिजे असा.


कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही बाजूचे सैनिक आपले आपले ध्वज खाली उतरवतात आणि मगच परेड संपते.

कार्यक्रम संपला आणि बहुदा लोकांमधली देशभक्ती पण संपली. प्रचंड गर्दी उसळली, जाण्यासाठी एकच घाई. सर्वत्र रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे प्लॅस्टिक रैपर्सचा खच पडला होता. कुणाला असे वाटले नाही कि निदान इथे तरी कचरा करू नये. ठिकठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी रिकामे पिंप ठेवले होते, पण इतके कष्ट घेतो कोण?


ज्यांना जागा मिळाली नाही अशी अनेक शेकडो लोक बाहेर उभी होती, जी ह्या आनंदाला मुकली होती. सर्व स्टेडियम रिकामे झाल्यावर त्यांना आतमध्ये सोडतात. तेव्हढाच काय तो त्यांना आनंद.

बाहेर आलो तर अजून एक बाई नुकतीच चक्कर येऊन पडली होती. तिला बर्फ लाव, तोंडावर पाणी मार वगैरे चालू होते.

“लाहोर २२ कि.मी” दर्शवणारा पांढरा-पिवळा माईलस्टोन दगड फोटोसाठी गर्दी जमवत होता.

तेथूनच पलीकडे पाकिस्तानची बॉर्डर दिसत होती. खालच्या फोटोत त्या झाडाच्या मागे जे काटेरी कुंपण दिसतेय तीच ती पाकिस्तानची बॉर्डर. दुसऱ्या बाजूने बहुदा आयात-निर्यात करण्यासाठी जाणारे ट्रक्स जातील असा रस्ता दिसत होता.



वाहन तळाकडे जाताना वाटेत डीजे लागला होता. तरुणाई बेभान होऊन नाचण्यात गुंग होती. आश्चर्य म्हणजे मध्येच त्याने आपले “सैराट” मधले “झिंग झिंग झिंगाट” लावले. महाराष्ट्रापासून इतके दूर, बॉर्डरवर आपले मराठी गाणे ऐकून भारी वाटले.

अख्या ट्रिप मधला मला वाटतं “वाघा-बॉर्डर”चा अनुभव सगळ्यात भन्नाट होता. आयुष्यात विसरू नये, विसरू शकणारच नाही असा.

त्या दोन तासाच्या उन्हात आम्ही वेडे-पिसे झालो होतो, आणि आपले सैनिक आयुष्य घालवता अश्या extreme ठिकाणी.

काय हालत होत असेल त्यांची राजस्थानच्या वाळवंटात? काय होत असेल त्यांचं हाडं गोठवणाऱ्या सियाचीनच्या थंडीत?
कधी कुठून गोळी येईल आणि काळजाचा, डोक्याचा वेध घेईल ह्याचा नेम नाही. तरीही तीच तडफ, तीच निर्भयता, तीच देशभक्ती कशी ठिकवून ठेवत असतील हि लोक? कसल्या रक्ता-मांसाची बनलेली असतात ही?

नेहमी जाणीव असतेच, पण आज खूप जास्त प्रकर्षाने झाली कि आपण किती सुखी आहोत, किती सुरक्षित आहोत. केवळ देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या ह्या निर्भीड सैनिकांमुळेच.

सलाम तुम्हाला अगदी … अगदी मनापासून.



I'm the author and owner of the most popular Marathi Novels blog - डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा https://manaatale.wordpress.com Here i will be sharing my travel stories

Comments